
प्रा.मुकुंद खैरे यांचं कोरोनाने निधन,2 आठवड्यात पत्नी आणि मुलीचाही कोरोनाने झाला होता मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच कुटुंबच संपत आहे अगदी असंच झालं आहे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील प्रा. मुकुंद खैरे यांच्या कुटूंबाचं.
आज सकाळी प्रा. मुकुंद खैरे यांचं अकोला येथे कोरोनावर उपचारादरम्यान निधन झालं. कोरोनानं अवघ्या पंधरा दिवसांत प्रा. खैरे यांच्या घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 19 एप्रिलला प्रा. खैरे यांच्या पत्नी छाया यांचं अकोल्यात कोरोनावर उपचारादरम्यान निधन झालं. तर 2 मे रोजी त्यांची 32 वर्षीय वकील असलेली मुलगी शताब्दी यांचं निधन झालं. तर आज सकाळी प्रा. खैरे यांचाही कोरोनानं मृत्यू झाला.
प्रा. मुकूंद खैरे हे समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष होते. 6 डिसेंबर 1991 मध्ये त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. प्रा. खैरे हे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील गाडगेबाबा महाविद्यालयातून राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. प्रा. खैरे आंबेडकरी चळवळ आणि संविधान अभ्यासकांतील मोठं नाव होतं. समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून त्यांनी दलित आणि आदिवासींचे प्रश्न व्यापकपणे मांडलेत. 1991 ते 2004 या काळात विदर्भात समाज क्रांती आघाडीची चळवळ ऐन भरात होती. त्यांच्या नेतृत्वात अनेक जिल्ह्यांमध्ये दलित आदिवासींच्या प्रश्नावर निघालेले हजारोंचे मोर्चे त्याकाळी चर्चेचा विषय झाले होते. प्रा. मुकुंद खैरे यांनी राज्यभरात राज्यघटनेवर अभ्यासपुर्ण व्याख्यानं दिली आहेत. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी आपल्या चळवळीला राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. प्रा. खैरै यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'(रिडालोस) कडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.