
प्राणघातक वारा; बाळासहित 100 फूट उंच उडाला पाळणा,बाळाचा दुर्देवी अंत
अंगावर काटा आणणारी यवतमाळमधील दुर्देवी घटना
यवतमाळमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यात एका दीड वर्षाच्या बाळाचा पाळणा आकाशात उंच उडून पुन्हा जमीनीवर आदळला आहे. या दुर्घटनेत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यवतमाळ : सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. ऐन एप्रिपलमध्ये पडणाऱ्या या पावसामुळं राज्यातील नागरिकांची पुरती धांदल उडत आहेत. अशातच काल यवतमाळ याठिकाणी आलेला सोसाट्याचा वारा एका कुटुंबासाठी काळ ठरला आहे. शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात एका दीड वर्षाच्या बाळाचा पाळणा आकाशात 100 फुटांपर्यंत उडाला आहे. त्यानंतर तेवढ्याच वेगात तो पाळणा पुन्हा जमीनीवर आदळला आहे. त्यामुळे या पाळण्यात झोपलेल्या दीड वर्षाच्या चिमूरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
संबंधित घटना यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील लोणी याठिकणी घडली आहे. तर संबंधित दीड वर्षीय मृत चिमुकल्याचं नाव मंथन सुनील राऊत असं आहे. लोणी या गावात राहणारे सुनील राऊत यांचं घर साध्या पद्धतीचं असून घरावर लोखंडी अँगलवर टिनचे पत्रे लावले होते. याच अँगलला दीड वर्षाच्या बाळाचा पाळणा बांधण्यात आला होता. दरम्यान शनिवारी दुपारी वादळी वारा आला आणि एक क्षणात होत्याचं नव्हतं केलं आहे. यानंतर तातडीनं बाळाला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संबंधित निष्पाप बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.