
धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा !: नाना पटोले
कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून त्यांना धमकी देणारा राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा पुनावाला यांनी करावा.
पुनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून लवकरात लवकर भारतात येऊन लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे आणि भारताची लसीची गरज भागवावी. गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले की, अदर पुनावाला यांनी राज्य वा केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितलेली नसताना केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवलेली आहे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवायची असेल तर त्यांच्या जीवाला धोका आहे हे तपासून आणि संबंधित व्यक्तीने अर्ज केल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवली जाते पण केंद्र सरकारने न मागताच पुनावाला यांना सुरक्षा दिली, यामागे काय राजकारण आहे? पुनावाला यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा पुरवली आहे काय ? याचा खुलासा पुनावाला व केंद्र सरकारने करावा.