
धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले
वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी घरातच आई- मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (४५) अशी मृतांची नावे आहेत. मृत आई व मुलगी कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत. शासकीय रुग्णालयात दोघांची कोरोना चाचणी (Coronavirus Test) करण्यात आली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. (Mother and Girl died in home due to coronavirus in Wardha)
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. कोविड बाबतची दक्षता घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. सुभद्रा आणि सुरेखा या मायलेकींचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.