
RFO दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अखेर नागपुरात अटक
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अखेर नागपुरात अटक करण्यात आली आहे
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. काल (28 एप्रिल) रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आलं असून त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली आहे.
RFO दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर DFO विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन तात्काळ अटक करण्यात आली. तसंच त्यांचं निलंबनही करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.