
महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम,एका दिवसात ५ लाख लोकांना लस!
लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून एका दिवसात राज्यात पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आतावरची विक्रमी नोंद केली असून सायं. ६ पर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू, असे नमूद करत मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवरून यंत्रणांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले