
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात काँग्रेसची कोविड मदत सहाय्यता मदत केंद्रेः नाना पटोले
काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना मदत करावीः एच. के. पाटील
कोरोना संकटाचा सामना करण्यात केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारने सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी झटकली आहे. पण राज्य सरकारने सर्वांना मोफत लस दिली पाहिजे. तसेच या संकटकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शक्य ती सर्व मदत करावी. असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सर्व कार्याध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षांची ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली. या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी वामशी चंद रेड्डी, संपतकुमार, बी.एम. संदीप, आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, डॉ. संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात सर्वात जास्त कोरोना रूग्णांची संख्या असतानाही त्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत मिळत नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस पक्ष सातत्याने लोकांची मदत करत आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कोविड सहाय्यता मदत केंद्र आणि हेल्पलाईन सुरु केली असून तिथून हजारो लोकांना दररोज विविध प्रकारची मदत केली जात आहे. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय ही मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करत आहेत. राज्य सरकार कठिण परिस्थितीत राज्य सरकार लोकांची काळजी घेत आहे. काँग्रेस पक्षही आपल्या परीने लोकांना मदत करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.