नागपूर

नागपूर जिल्ह्यात ४ ठिकाणी पर्यटन सुरु होणार

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ

नागपूर दिनांक २६ नोव्हेंबर ( प्रतिनिधी)

संविधान दिनाचे औचित्य साधून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ केला.डॉ बाबासाहेब यांच्या जीवनातील महत्त्वाच्या जागांवर ही पर्यटनाची सुरुवात आहे.नागपूर जिल्ह्यातील चार ठिकाणचे पर्यटन अनुयायांसाठी लवकरच सुरू होणार आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या मार्फत या संदर्भातील एक कार्यक्रम दीक्षाभूमी येथे आयोजित करण्यात आला होता. राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. तर दीक्षाभूमीवरून भदंत सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेत आमदार प्रवीण दटके सहभागी झाले होते.

याशिवाय व्यासपीठावर सुप्रसिद्ध साहित्यिक कवी ज्ञानेश्वर वाकुडकर, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, प्रदीप आगलावे, एन.आर.सोटे आदींचा सहभाग होता. दीक्षाभूमी येथील स्तूपाजवळ मंडप उभारून या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील नागपूर शहरातील दीक्षाभूमी, चिंचोली येथील शांतीवन,कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, तसेच कामठी परिसरातील नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिझम या चार ठिकाणचा पर्यटनासाठी समावेश करण्यात आला आहे. पर्यटन संचालनालयामार्फत या संदर्भातील वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून अत्यंत माफक दरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी, अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी ही सुविधा राज्य सरकार मार्फत पर्यटन विभाग उपलब्ध करून देणार आहे.

महाराष्ट्रात आज हा कार्यक्रम नाशिक येथील काळाराम मंदिर, कोकणातील महाड येथील चवदार तळे, पुणे व दीक्षाभूमी नागपूर येथे लाईव्ह करण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

लाईव्ह कार्यक्रमापूर्वी स्थानिक स्तरावर मोठ्या संख्येने वेगवेगळे कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने आयोजित केले होते. मी रमाई बोलते या नाटिकेचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले. तर सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी यावेळी संबोधित केले.

मुख्य कार्यक्रमांमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वातून क्रांती घडली, प्रेरणा मिळाली, त्या सर्व ठिकाणांना अनुयायांना, पर्यटकांना, अभ्यासकांना भेट देता यावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राज्य शासन चैत्यभूमी येथील जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यास वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!