पूर्व विदर्भ

पाणी टंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – पालकमंत्री सुनील केदार

पालकमंत्र्यांकडून वर्धा तालुक्यातील गावांचा आढावा

वर्धा दिनांक 19 एप्रिल  (प्रतिनिधी) :

उन्हाळयाच्या दिवसांमध्ये काही गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी टंचाई आराखडा तयार करुन अशा गावांमध्ये प्राधान्याने पाणी पुरवठयाची कामे प्रस्तावित करतो. ही कामे कालमर्यादेत पुर्ण करण्यासोबतच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावातील कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गांवाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उप वनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजु कळमकर, उप विभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी यावेळी गावनिहाय पाणी टंचाई, जलजीवन मिशन, अतिक्रमन नियमानुकुल करणे, अंगणवाडी बांधकाम, वर्ग खोल्या बांधकाम, उप आरोग्य केद्र बांधकाम, जनसुविधा व नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर कामाची सद्यस्थिती, पांदन रस्ते यासह विविध विषयाचा आढावा घेतला.

टंचाईची कामे करतांना गावांना उन्हाळयात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा हा उद्देश असतो. परंतु उन्हाळा संपत असतांनाही कामे पूर्ण होत नाही. असे होता कामा नये . मंजूर झालेल्या आराखडया प्रमाणे कालमर्यादेत ही कामे करण्यात यावी. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामांना मंजूरी देण्यात आली आहे. ही कामे सुध्दा प्राधान्याने आणि काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावी. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी निकषाप्रमाणे आपल्या गावातील पाण्याची नियमित जलतपासणी करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देणे, विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव, कृषि पंप जोडणी, स्मशान भूमी बांधकाम व दुरुस्ती, घरकुल आदींचाही पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील. सरपंच व सचिवांकडून त्यांनी गावातील समस्याची माहिती जाणून घेतल व या समस्या निकाली काढण्यासाठी सबंधित अधिका-यांना सूचना केल्या.

आमदार पंकज भोयर यांनी वर्धा शहरालगत असलेलया 10 ग्राम पंचायतीच्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विषय मांडला. शहरालगतच्या गावांचे झपाटयाने शहरीकरण होत असल्याने वाढत्या शहरीकरणास वाढत्या सुविधा पुरविण्याकारीता या गावांचे नगर पंचायती मध्ये रुपांतरण करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. याबाबत पालकमंत्री महोदयांनी प्राधान्याने लक्ष घालावे असेही आ. पंकज भोयर यावेळी म्हणाले.

बैठकीला तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा, बांधकाम, जलसिंचन, आरोग्य, महिला बाल कल्याण, महसूल आदी विभागासह तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे सरपंच व सचिव उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!