
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी
करोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी दि. २७ एप्रिल, २०२१ रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. करोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत.