नागपूर

स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा

नागपूर दिनांक 28 सप्टेंबर ( शहर प्रतिनिधी)

स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Comity) बुधवारी (ता.२८) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात बुधवारी (ता. २८) स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Comity) बैठक पार पडली.

बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलींद सुर्यवंशी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. टिना गुप्ता, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.

स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

बैठकीमध्ये नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयीत स्वाईन फ्लू रुग्ण व त्यातील बाधित यासर्वांचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर आठवड्यातील ५ स्वाईन फ्लू संशयीत रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता यापैकी ४ रुग्ण नागपूर शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी २ मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले. नागपूर ग्रामिण भागातील १ रुग्णाचा मृत्यू झालेला असून तो स्वाईन फ्लू मुळे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवडाभरात नागपूर शहरात एकूण २ मृत्यू हे स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ६२ आणि ४७ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.

४९७ रुग्ण स्वाईन फ्लू मुक्त 

नागपूर शहरात आतापर्यंत ६०८ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, वेळेवरील उपचार आणि योग्य काळजी घेतल्यामुळे ४९७ रुग्णांनी स्वाईन फ्लूवर विजय मिळविला आहे. नागपूर शहरातील ३२८, नागपूर ग्रामिण मधील १०४ आणि जिल्ह्याबाहेरीत १७६ अशा एकूण ६०८ स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत मनपा हद्दीतील १७, जिल्हा क्षेत्रातील ६, नागपूर जिल्ह्याबाहेरील १४ आणि इतर राज्यातील ११ असे एकूण ४८ रुग्ण स्वाईन फ्लू मुळे मृत्यूमुखी पडले आहेत. ४९७ रुग्ण स्वाईन फ्लू ला हरवून सुखरूप घरी पोहोचणे ही सुखद बाब असून वेळीच सतर्कता दाखवून वैद्यकीय उपचार घेतल्यास स्वाईन फ्लू वर मात करणे शक्य आहे.

सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फलू सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!