
केद्रानं रेमडेसिविरचं व्यवस्थापन स्वत:कडं ठेवण्याचं प्रयोजन काय?,’राज ठाकरे यांचे पीएम मोदीना पत्र
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ‘रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार आहे. ही बातमी वाचून मला धक्काच बसला आहे. केंद्रानं रेमडेसिविरचं व्यवस्थापन स्वत:कडं ठेवण्याचं प्रयोजन काय?,’ असा सवाल राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केला आहे.
‘देशातील सध्याची परिस्थिती खरंच भीषण आहे. ही वेळ राजकारणाची मुळीच नाही. सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत केंद्राची भूमिका ही साहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. राज्य सरकारांची यंत्रणा प्रत्यक्षात काम करत आहे. त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक यात अग्रभागी आहेत. लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणं ह्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असं असताना केंद्रानं रेमडेसीविरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय? केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये. रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही. अशामुळं प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणांवरचा अविश्वास दिसून येतो,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या १०० वर्षांत आलं नसावं. हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे. तिथं आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पध्दतीचा आत्माही तोच आहे,’ ‘माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करून आपण राज्यांना प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल,’ असेही त्यांनी शेवटी पत्रात लिहिले आहे