नागपूर

पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा 

मनपा आयुक्त तथा प्रशासकांचे निर्देश : पावसाळापूर्व तयारीचा घेतला आढावा

 नागपूर दिनांक २४ मे ( प्रतिनिधी)

पावसाळ्यात आपात्कालीन स्थितीसाठी नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवून प्राधान्याने त्याकडे लक्ष देण्यात यावे. पावसाळ्यात नागरिकांकडून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देउन त्यावर कार्यवाही करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.

पावसाळापूर्व तयारीचा मंगळवारी (ता.२४) मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन येथील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मुख्य अभियंता  प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता  मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपायुक्त मिलींद मेश्राम, सहा.आयुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण,  अविनाश बारहाते, सहायक आयुक्त  गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राउत, अशोक पाटील, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी झोननिहाय करण्यात येणा-या कार्यवाहीचा आढावा घेतला. पावसाळ्यामध्ये उद्भवणा-या परिस्थितीत मनपाच्या अग्निशमन विभागाची भूमिका आणि कार्य अत्यंत महत्वाचे असते.

अशा स्थितीत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी येत्या १ जून २०२२ पासून मनपा मुख्यालयासह दहाही झोनमध्ये २४ तास आपात्कालीन सहकार्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी यावेळी दिली.

नदी, नाल्यांसह, पावसाळी नाल्या, सिवर लाईन यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करून त्यामुळे पाणी जमा होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष दिले जावे. याशिवाय ज्या इमारतींच्या तळमजल्यात (बेसमेंटममध्ये) पाणी जमा होते त्यासंदर्भात झोन स्तरावर कार्यवाही करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. बेसमेंटमध्ये पाणी जमा होणा-या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

तसेच ज्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी जमा होते त्या इमारतींना नोटीस बजावून पाणी जमा होउ नये याची काळजी घेणे व स्वत: इमारतधारकांनी घ्यावयाच्या काळजी बाबत नोटीसद्वारे माहिती देण्याचेही आयुक्त तथा प्रशासकांनी निर्देशित केले.

नागपूर शहरातील जीर्ण व अतिजीर्ण घरांची झोननिहाय माहिती सादर करून त्यापैकी किती इमारतींचे प्रकरण न्यायालयात आहे, किती इमारतींवर कारवाई करण्यात आली व नोटीसनंतर झालेल्या कार्यवाहीसंदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचेही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. नदी काठांवर असलेल्या वस्त्यांना पावसाळ्यात निर्माण धोका लक्षात घेता त्याबाबत प्रशासनाकडून करण्यात येणा-या कार्यवाहीचा सुद्धा त्यांन आढावा घेतला.

एकूणच मेलहोलवरील झाकण, पावसाळी नाल्या, सिवर लाईनची स्वच्छता, पावसाळ्यात पडलेल्या झाडांच्या तक्रारींवर तात्काळ प्रभावाने कार्यवाही, धोकादायक इमारतींसंदर्भात कार्यवाही, बेसमेंटमध्ये जमा होणारे पाणी या सर्वांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!