
यवतमाळ – वाशिम जिल्हा सीमेवर प्रवेश करण्यास 21 एप्रिलपर्यंत पूर्णत: बंदी
यवतमाळ, दि. 19 : वाशिम जिल्ह्यातील मानोरा ग्राम पोहरादेवी येथे दिनांक 14 ते 21 एप्रिल 2021 (श्रीराम नवमी) या कालावधीत आयोजित करण्यात आलेली संत सेवालाल महाराज संस्थान तसेच श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथील यात्रा रद्द करण्याबाबत वाशिम जिल्हाधिका-यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच याबाबत यवतमाळ पोलिस अधीक्षक यांनीसुध्दा प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक असल्याबाबत कळविले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यालगतच्या सर्व तालुका, पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये 15 ते 21 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पोहरादेवी व श्रीक्षेत्र उमरी खुर्द याकडे जाणाऱ्या मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी / अटकाव करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी व श्रीक्षेत्र उमरी खुर्द याकडे जाणाऱ्या सर्व भाविक व यात्रेकरूच्या वाहनांना यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्हा हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच पायी जाणाऱ्या सर्व भाविक व यात्रेकरूंना प्रतिबंध / अटकाव करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस, पुसद, नेर या तालुका कार्यक्षेत्रातून श्रीक्षेत्र पोहरादेवी व श्रीक्षेत्र उमरी खुर्द याकडे जाणा-या सर्व मार्गावर बॅरीकेटस् उभारून बंद करण्यात यावेत.
अशा ठिकाणी चेकपोस्ट उभारून यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यामध्ये वाहनाने अथवा पायी जाणाऱ्या भाविकांविरुध्द साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशात म्हटले आहे. यासंदर्भात नांदेड व आदिलाबाद पोलिस अधिक्षकांनासुध्दा जिल्हाधिका-यांनी पत्र लिहिले असून पुसद व दारव्हा उपविभागीय अधिकारी तसेच पुसद, दारव्हा, नेर, दिग्रस तहसीलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात याबाबत सुचनांची अंमलबजावणी करावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहे