पश्चिम विदर्भ

महाराष्ट्राच्या जडणघडणीत यवतमाळचा मोठा वाटा – पालकमंत्री संदिपान भुमरे

यवतमाळ दि. १ मे (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांनी केले मुख्य शासकीय ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन आपण आज साजरा करत आहोत. या 62 वर्षातील राज्याच्या प्रगतीत व जडणघडणीत यवतमाळ जिल्ह्याचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी केले.

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी येथील समता मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले की यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री दिले. या दोघांनी देशाला दिशादर्शक ठरतील अशा योजना आणि धोरणांची मुहर्तमेढ रोवली. सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहीलेले वसंतराव नाईक यांनी देशात हरितक्रांती घडवून आणली. त्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेली रोजगार हमी योजना केंद्र शासनाने संपुर्ण देशासाठी लागू केली. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. खाजगी व सार्वजनिक मालमत्तांची निर्मिर्ती होउन देशात पायाभूत सुविधा तयार झाल्या. आज योगायोगाने मी त्याच खात्याचा मंत्री आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच जलसंधारण चळवळीचा पाया रचल्याचे त्यांनी सागीतले. ज्या यवतमाळ जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले त्या यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतांना मला मनस्वी आनंद होत असल्याचेही ते म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासन कायम प्रयत्नशील आहे. मराठी भाषेचा विकास व संवर्धनाकरिता मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात 100 कोटी निधी राखीव ठेवला असून नुकतेच गुडीपाडव्याला या भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती दिली आणि महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले.

यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक न्यायाच्या आणि जनकल्याणाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, निवासी शाळा, निवासी वसतीगृहे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्टॅन्ड अप योजना, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या महत्वाच्या योजनांमध्ये जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आजपासून शिक्षण विभागात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनिम अंतर्गत 105 लोकसेवा नव्याने अधिसूचित करण्यात आल्याचे तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर ‘शिक्षण संवाद दिन’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री यांनी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर त्यांनी पोलीस दल परेड संचलनची पाहणी केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यवतमाळ जिल्यात ने 64 लाख 46 हजार रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी उद्दिष्टाच्या 127 टक्के संकलीत केल्याने सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना पालकमंत्री यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

28 सप्टेंबर 2021 रोजी उमरखेड-पुसद मार्गावर दहागाव येथील बस दुर्घटनेत बसमधील प्रवाशांचे जीव वाचविण्यात मदत केल्याबद्दल महागाव येथील नागरिक अविनाश सवाई राठोड यांचा सत्कार करण्यात आला.

समता मैदानावरील सामाजिक न्याय योजनांच्या माहिती स्टॉलला पालकमंत्री यांनी भेट देवून पाहणी केली. याठीकाणी त्यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत प्राधिनिधीक स्वरूपात जमीन वाटप प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मार्गदर्शीकेचे प्रकाशन केले.

जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय विभागातील योजनांचे लाभार्थी यांच्या यशोगाथांचे व्हीडीओ सि.डी.चे विमोचन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांच्या उपस्थित करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी व नायब तहसिलदार एकनाथ बिजवे तसेच पोलीस निरीक्षक सतिश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार निसार अहमद खान, आशिष अवझाडे, चालक सहायक पोलीस निरीक्षक किशोर गजभिये व हवालदार प्रशांत महाजन, डॉ. ललिता जतकर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी समता मैदान येथे विरमाता, विविध विभागाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!