
हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय
मेडिकल जर्नल Lancet ने कोरोना व्हायरससंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. हा घातक व्हायरस प्रामुख्याने हवेतून पसरतो आणि याचे ठोस पुरावेही आहेत, असे लॅन्सेटने म्हटले आहे. (America CoronaVirus is predominantly transmitted through air says lancet study on coronavirus) अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांनी दावा केला आहे, की हा व्हायरस हवेतून पसरत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगूनही आणि उत्तम प्रकारची आरोग्य सुविधा असतानाही त्याचा वेगाने प्रसार होत आहे.
तज्ज्ञांच्या या टीममध्ये CIRES (Cooperative Institute for Research in Environmental Sciences) केमिस्ट जोस लुइस जिमेनेज यांचेही नाव आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे, की त्यांना कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत आणि ही गोष्ट नाकारली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनेही या रिसर्चची समीक्षा केली आहे आणि कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याच्या दाव्याला हायलाइट केले आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ मोठ्या ड्रॉपलेट्सपासूनच कोरोना पसरतो, याचे कुठलेही पुरावे नाहीत. हा व्हायरस हवेतून वेगाने पसरतो, हे सिद्ध झाले आहे, असेही या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.
बचावाचे उपाय
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोनाचा प्रसार बंद जागेत, कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी अधिक प्रमाणात होतो. या अभ्यासानंतर आता प्रश्न उद्भवू लागले आहेत की कोणत्या उपाययोजनाद्वारे हवेद्वारे होणारे संक्रमण थांबविले जाऊ शकते? तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या संसर्गजन्य विषाणूचा प्रामुख्याने हवेतून प्रसार होत असेल तर एखाद्या संसर्गजन्य व्यक्तीचे बोलणे, ओरडणे, गाणे किंवा शिंका येणे दरम्यान बाहेर सोडल्या जात असलेल्या थेंबांमुळे अशी स्थिती उद्भवत असावी.