
अकोल्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार : बच्चू कडू
अकोला: देशातील पहिला हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लान्ट अकोल्यामध्ये उभारण्यात येणार आहे त्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली. हा प्लान्ट राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिला असेल असे ते म्हणाले.
ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या यासंदर्भात राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच सध्यस्थितीत ऑक्सिजन तुटवडा असल्याचा विषयही समोर आला. तेव्हा हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्यासंदर्भात काही करता येईल का, या विषयावर चर्चा करण्यात आली.
ही व्यवस्था निर्माण करणाऱ्या एका कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून या बैठकीमध्येच त्याचे सादरीकरण दिल्या गेले. आणि कुठलाही वेळ न दडवता याच बैठकीत पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री कडू यांनी दिली. हा प्लान्ट महिनाभराच्या आत उभा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा अकोट या ठिकाणी हा प्लान्ट उभा राहू शकतो. हा प्लान्ट राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला प्लान्ट राहणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.