
धक्कादायक! पाच दिवसांच्या करोनाबाधित चिमुकल्याचा मृत्यु
करोना बाधित महिलेच्या प्रसुतीनतंर बाळालाही करोनाची लागण झाल्याने या बाळाचा अवघ्या पाच दिवसात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या किनगाव येथील एका गर्भवती महिलेने शनिवारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. मातेच्या पोटात पाणी झाल्यामुळे साडे सात महिन्यातच सिझर करावे लागले. कमी दिवसाचे (३० आठवड्याचे) असल्याने जन्मानंतर पहिल्या दिवसांपासूनच या बाळाची प्रकृती गंभीर होती. त्याचे वजन देखील कमी होते. बाळाला पहिल्या दिवसापासूनच श्वास घ्याला त्रास होत होता. त्यामुळे बाळाला देखील ऑक्सिजन सुरु होता. आधीच कमी दिवसाचे हे बाळ असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. आज शुक्रवारी पाचव्या दिवशी बाळाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.