Breaking Newsमहाराष्ट्र

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे*

*विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांच्याशी साधला संवाद*

गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.

आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

*पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडीट करून घ्या*

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे .

ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी

आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा , वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे . सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या .

विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षत आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असेही ते म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!