नागपूर

27 फेब्रुवारीला पल्स पोलीओ मोहीम,2702 केंद्र स्थापित

नागपूर,दि. 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

एक लाख त्र्यानऊ हजार बालकांचे करणार लसीकरण

 5 हजार 557 कर्मचारी नियुक्त

 

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राबविण्यात येणार असून ग्रामीण भागात 1 लाख 93 हजार 350 बालकांना पोलीओचा डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांनी दिली.

पल्स पोलीओ लसीकरणाचा वयोगट शुन्य ते पाच वर्षाचा असून या बालकांना पोलीओ डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात एकूण 2 हजार 702 लसीकरण केंद्र असून यासाठी 5 हजार 557 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका दवाखाने, महानगरपालिका येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. गावपातळीवर आरोग्य सेवक, सेविका आशा स्वयंसेविका या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मुबलक लससाठा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे.

27 फेब्रुवारीला होणाऱ्या लसीकरण मोहिमेतून ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना 28 फेब्रुवारीपासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून पोलीओ लस पाजण्यात येणार आहे. पोलीओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात 215 ट्रांझिट टिमद्वारे बस स्टँड, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी, यासोबतच 136 मोबाईल टिमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्यांची मुले यांना पोलीओचे डोस पाजण्यात येणार आहेत.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लसीकरणासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन सर्व बुथवर व आयपीपीआय मोहीम राबवितांना करण्यात येणार आहे.

शुन्य ते पाच वर्ष वयाच्या बालकांना यापूर्वी पोलीओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पोलीओ लसीकरण करुन घ्यावे व मोहीम शंभरटक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांनी केले आहे.

०००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!