
श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सवासंदर्भात शेगाव संस्थानाकडून मोठी माहिती
विदर्भ दिनांक 22 फेब्रुवारी ( प्रतिनिधी)
गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. यावर्षी देखील अतिशय साध्या पद्धतीने श्रींचा प्रकटदिन उत्सव साजरा केला जाणार असल्याचं संस्थानाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
श्रींचा प्रगटदिनोत्सव धार्मिक प्रथा-परंपरेनुसार दरवर्षी विविध कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आणि कोविड विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. यंदाच्या साली देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता ‘श्रींचा प्रगटदिनोत्सव १७ ते २३ फेब्रुवारी २०२२ या काळात संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत ई-दर्शन पासद्वारे भाविकांसाठी श्री दर्शन सुविधा उपलब्ध असून अनुषंगिक निवास व भोजनप्रसाद व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यवस्था प्रगटदिनोत्सव काळातही आहेत. तशाच नियमानुसार सुविधा उपलब्ध राहतील. तरी सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात येत आहे.
गजानन महाराज प्रकटदिन उत्सवात राज्यभरातून हजारो दिंड्या सहभागी होतात. या माध्यमातून लाखो भाविक पायदळी प्रवास करतात. दिंडीमध्ये आबाल वृद्धांचा सहभाग दिसून येतो. परंतु या वर्षी मर्यादित स्वरुपाचा उत्सव साजरा करण्याचं संस्थानाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
श