
मागील 75 वर्षातील माहितीचे गॅझेटिअर प्रथमच मराठीत तयार होणार
यवतमाळ दि. 21 फेब्रुवारी (प्रतिनिधी) :
*सात दिवसात माहिती सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश*
महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांची उपस्थिती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्य प्रत्येक जिल्ह्याचे विशेष पुरवणी गॅझेटिर ग्रंथ व त्याचे इ-स्वरूपात प्रकाशन करण्याची महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे. त्यानुसार जिल्ह्यात मागील 75 वर्षात झालेला विकास, भौगोलीक व ऐतिहासिक बदल याबाबतची माहिती पुढील सात दिवसात जिल्हा माहिती कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
प्रशासकीय विभागांनी कालमर्यादेत माहिती सादर न केल्यास व त्यामुळे गॅझेटिअरचे काम प्रलंबित राहील्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी.कचरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, नगरपालीकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय खंगार, जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले की प्रत्येक जिल्ह्यात इंग्रज काळापासून गॅझेटिअर तयार होत होते. यवतमाळचे पहिले गॅझेटिअर 1908 मध्ये निघाले होते. ते 1974 मध्ये अद्यावत करण्यात आले. 1990 पासून प्रादेशिक भाषेत गॅझेटिअर करण्याची शासनाने भूमिका घेतली आहे.
अद्याप यवतमाळचे गॅझेटिअर मराठी आलेले नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्याचे विशेष पुरवणी गॅझेट मराठीतून बनविण्यात येणार आहे. यात मागील 75 वर्षात जिल्ह्यात काय विकास झाला हे गॅझेटिअरच्या माध्यमातून कळावे अशी अपेक्षा आहे. यात स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यातील ऐतिहासिक बदल व महत्वपुर्ण घटनाक्रम, भूगोल, लोकसंख्या, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यवसाय व्यापार व वाणिज्य, वाहतूक दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासकीय बदल, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थळे याबाबतची माहिती, आकडेवारी व छायाचित्राचा समावेश गॅझेटिअरमध्ये करण्यात येणार आहे.
बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, एम.आय.डी.सी. चे उपअभियंता म.ना. केदारपवार, माविम च्या मिनाक्षी शेंडे, जिल्हा कारागृहचे सोहेल शेख, सहाय्यक निबंधक आ.सी.गुर्जर, क्रीडा अधिकारी चैताली राऊत, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. टि.ए.शेख, प्रशांत पाटील, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, पोलीस विभागाचे पी.डी.राठोड, सुशिला पवार, प्रदिप शेवलकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.