
वर्धा जिल्हयाचे विशेष गॅझेटीअर प्रकाशित होणार
वर्धा, दि.21 (प्रतिनिधी)
अमृत महोत्सवी वर्षानिमितत विशेष उपक्रम
मागील 75 वर्षाच्या विकासाचा समावेश
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्धा जिल्हयाचे विशेष जिल्हा पुरवणी गॅझेटीअर प्रकाशित करण्यात येणार आहे. गॅझेटीअर मध्ये स्वांतत्र्य प्राप्ती पासुन आतापर्यंत झालेल्या विकासाची सांख्यिकीय माहिती राहणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या उपस्थितीत गॅझेटीअरच्या निर्मिती बाबतची बैठक पार पडली.
बैठकीला जिल्हाधिका-यांसह राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर राज्याने विकासाच्या बाबतीत विविध क्षेत्रात आघाडी घेतली आहे. या विकास कामांचा सांख्यिकीय आढावा या गॅझेटीअर मधून घेण्यात येणार आहे.
राज्यातील सर्वच जिल्हयाचे असे गॅझेटीअर प्रकाशित होत असून त्या त्या जिल्हयाने विकासाच्या बाबतीत केलेल्या बाबींचा समावेश यात राहणार आहे.
वर्धा जिल्हयाचे प्रथम गॅझेटीअर इग्रजांच्या काळात 1906 मध्ये इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आले होते. याच गॅझेटीअरची सुधारित इंग्रजी आवृत्ती 1974 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. तर 1992 मध्ये जिल्हयाचे मराठी गॅझेटीअर सुधारित आवृत्तीसह प्रकाशित करण्यात आले होते. तीस वर्षानंतर सांख्यिकीय माहितीच्या आधारे विकासाचा आढावा घेणारे विशेष गॅझेटीअर प्रकाशित करण्यात येणार आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्वच जिल्हयाचे गॅझेटीअर प्रकाशित करण्याच्या सूचना दर्शनिका विभागास दिल्या आहे. त्याप्रमाणे जिल्हा गॅझेटीअरसाठी माहितीचे संकलन पूर्ण झाले असून गॅझेटीअर लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत दिले. दर्शनिका विभागाचे सचिव बलसेकर यांनी गॅझेटीअरच्या निर्मिती बाबतची माहिती यावेळी सादर केली.