
पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तोंडात कापडाचा बोळा टाकून शारीरिक संबंध,कोर्ट म्हणाले…
नागपूर दिनांक 31 फरवरी (प्रतिनिधी)
पत्नीची इच्छा नसताना तिचे हात-पाय बांधून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे ही क्रूरता असल्याचे स्पष्ट करीत नागपूर कौटुंबिक न्यायालयाने विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला संमती दिली आहे.
नागपुरातील वाडी परिसरातील हे दाम्पत्य आहे. या प्रकरणातील विवाहिता ही २२वर्षीय तरुणी असून तिने २८वर्षीय पतीपासून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या दाम्पत्याचा २०१७मध्ये विवाह झाला. पतीला दारूचे व्यसन होते. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत. पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिल्यावर पती तिच्यावर बळजबरी करायचा. पत्नीने केलेल्या आरोपांनुसार, पती तिचे हात-पाय बांधून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असे. तिने आरडाओरड करू नये, यासाठी तो तिच्या तोंडात कापडाचा बोळा घालत असे.
या प्रकारामुळे पत्नी धास्तावली व माहेरी गेली. तिने हा प्रकार तिच्या सासूला सांगितला. ‘असे परत होणार नाही’, अशी शाश्वती सासूने दिल्यानंतर ती सासरी परतली. त्यानंतरही पतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे तिच्या लक्षात आले.
दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. ती कंटाळून माहेरी गेल्यास पती तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, मारहाण करायचा. अखेर तिने तिचे वकील श्याम अंभोरे यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर या घटस्फोटाला मंजुरी दिली.