
दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला !: नाना पटोले
राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवून विद्यार्थ्यांचा या महामारीच्या धोक्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला.
दहावी बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असते. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु मागील दोन महिन्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या वेगाने वाढलेले आहे. राज्यातील सरकारी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीच्या संघर्षात लढा देत आहे.
राज्य सरकार कडक निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना परीक्षा घेणे संयुक्तीत ठरणार नाही. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता परीक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, परिक्षेसाठी लागणारा इतर कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक घटक यावेळी संपर्कात येतात. यातून एख्याद्याला कोरोनाची लागण झाली तर त्यातून अनेकांना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांकडूनही बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे अभ्यास अशा दुहेरी कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत. याबाबात सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करावा ते सर्वांच्याच हिताचे होईल असे पटोले म्हणाले.