
देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. पण रेल्वे सेवा बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. गरज पडल्या अधिक ट्रेन चालवल्या जातील, असं रेल्वेकडू स्पष्ट करण्यात आलं आहे. अनेक राज्यांमधून स्थलांतरीत मजूर आपल्या गावी परतत असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेचा हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. रेल्वे गाड्या कमी पडू देणार नाही आणि रेल्वे गाड्यांची मागणी वाढल्यास अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली जाईल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले.
ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी रेल्वे गाड्यांची कुठलीही कमी नाही. मागणीनुसार रेल्वे गाड्या चालवण्यात येतील. तसंच प्रवासासाठी प्रवाशांकडून करोना निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही, असंही रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या शर्मा यांनी स्पष्ट केलं. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे वाहतूक बंद करण्याची किंवा गाड्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कुठलंही पत्र मिळालेल नाही, असंही सुनीत शर्मा यांनी सांगितलं.
रेल्वे बंद करणे किंवा रेल्वे गाड्या कमी करण्याची सध्यातरी कुठलीही योजना नाहीए. आवश्यक तेवढ्या ट्रेन आम्ही चालवू. चिंता करण्याची काहीही गरज नाही. उन्हाळ्याच्या दृष्टीने प्रवाशांची संख्या सामान्य आणि गर्दी कमी करण्यासाठी आम्ही आधीच अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली आहे, असं त्यांनी सांगितलं.