नागपूर

विधान परिषद निवडणुकीसाठी उदया मतमोजणी,8 वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात

नागपूर दि. 13:-(प्रतिनिधि)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.

या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. यात 283 महिला आणि 271 पुरुष मतदारांचा समावेश होता. एकूण 560 पैकी 554 मतदारांनी मताधिकार बजावला आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रविंद्र भोयर व अपक्ष मंगेश देशमुख हे उमेदवार असून उद्या दुपारपर्यंत विजयी उमेदवार माहिती होणार आहे.

मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा निश्चित करण्यात येईल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळून कोटा पूर्ण होईल तो उमेदवार विजयी घोषित करण्यात येईल.

परंतु पहिल्या पसंतीची मते मिळून एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही. तर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या आधारे मतमोजणी होईल. यात कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होईल. मतमोजणीच्या वेळी अगोदर अवैध मते शोधण्यात येतील. प्रथम पसंतीक्रम न दर्शविणे, पसंतीक्रम शब्दात नोंदविणे, चुकीच्या पध्दतीने क्रमांक लिहिणे, वेगळा पेन वापरणे इत्यादी कारणांमुळे मत अवैध ठरु शकते. मतमोजणीच्या सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करुन अवैध मते बाजूला करण्यात येणार आहे. 4 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात उदया बचत भवन पारिसरात प्रवेशपत्र असणाऱ्या व्यक्तींनाच मुख्य प्रवेशव्दारातून परवानगी मिळणार आहे. अन्य अभ्यागत व कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील प्रवेशव्दारातून परवानगी दिली जाणार आहे. 200 मिटर क्षेत्र प्रतिबंधीत असून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बचत भवन येथे मतमोजणी प्रक्रीयेचा आढावा घेतला. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!