
महाराष्ट्रात परप्रांतियांमुळे कोरोना वाढला – राज ठाकरे
पश्चिम बंगालमध्ये निवडणुंकाचा प्रचार जोरात असतानाही तिकडे कोरोनाची लाट येत नाही पण महाराष्ट्रातच का येते, याला परराज्यात येणारे लोक जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
सोमवारी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूम कॉलवर लॉकडाऊनवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातच रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे याबाबत बोलणे झाल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रात उद्योग जास्त असल्याने बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. इतर अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोजले जात नसल्याने तिथले आकडेच येत नाहीत, असे सांगत एकप्रकारे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.
शिक्षण ऑनलाईन सुरू असल्याने शाळांची फी निम्मी करावी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा, खेळाडूंना सरावासाठी परवानगी द्या. गर्दी होणार नाही तिथे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्या सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला असल्याने हमीभाव द्यावा, अशा मागण्या राज ठाकरे यांनी केल्या.