
जिल्ह्यातील चार रेस्टॉरेंट व बारवर कारवाई
नागपूर : कोरोना संसर्ग काळामध्ये विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी घातलेले निर्बंध टाळणाऱ्या जिल्ह्यातील चार रेस्टोरेंट आणि बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव संदर्भात दिलेल्या निर्देशाचे अनुज्ञप्तीधारक पालन करतात का तसेच किरकोळ मद्य विक्री दुकाने निर्धारित वेळेवर बंद होतात का याबाबत तपासणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवित आहे. यामध्ये उमरेड येथील भूमी रेस्टॉरंट अँड बार, पाचगाव येथील पूनम रेस्टॉरंट बार (आडवाणी ढाबा) , उमरेड ते गिरद रोड वरील निसर्ग रेस्टॉरंट अँड बार तसेच नागपूर शहरातील मोरया रेस्टॉरंट अँड बार या चार अनुज्ञप्तीविरूद्ध विभागीय तक्रार नोंदविण्यात आली आहे. या चारही दुकानाचे व्यवहार निलंबित करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येणार आहे. यापुढे सुद्धा अनुज्ञप्ती विहीत वेळेवर बंद होतात किंवा नाही, हे तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. साथरोग नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी आपली आस्थापने वेळेत व विहीत कालावधीतच बंद करावीत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.