पश्चिम विदर्भ

सर्व शासकीय व खाजगी आस्थानेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक :  जिल्हाधिकारी यांचे आदेश 

 सर्व आस्थापनेत लसीकरण बंधनकारक

 विविध कामांसाठी भेट देणारे अभ्यागत, निमंत्रीतांचे लसीकरण आवश्यक

 लसीकरण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सोबत ठेवावी

 भाजी मंडई तसेच बाजारात येणारे विक्रेत्यांनी लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगावे

 

यवतमाळ दि. 30 नोव्हेंबर :(प्रतिनिधि)

दक्षिण आफ्रिका, बोस्टवाना, नेदरलँड व युरोपातील इतर काही देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ नावाच्या विषाणूचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्यामुळे त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन दक्षता घेणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन व कार्यवाही करत आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एक सर्वोत्तम उपाय आहे आणि जगभरातील शास्त्रज्ञांनी सुद्धा लसीकरणानंतर कोरोनामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या आजारावर किंवा प्रसारावर प्रतिबंध लागत असल्याबाबत वेळोवेळी कळविले आहे. सबब जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी व त्यावरील उपाययोजनांसाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासकीय तसेच विविध खाजगी आस्थापनेत लसिकरण बंधनकारक करणेबाबत आदेश निर्गमित केला आहे.

जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, विविध प्रकारच्या बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, महामंडळे, खाजगी कार्यालये, सर्व प्रकारच्या शाळा व शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, अभ्यासिका, ग्रंथालये यामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लसीकरण करुन घेणे बंधनकारक करण्यात येत आहे. याबाबतच्या अंमलबजावणीसाठी संबंधित कार्यालय प्रमुख जबाबदार राहतील.

शासकीय कार्यालयांमध्ये तसेच उपरोक्त नमूद सर्व आस्थापनांमध्ये विविध कामांसाठी भेट देणारे अभ्यागत, सभेसाठी उपस्थित राहणारे निमंत्रित, कार्यक्रमासाठी हजर राहणारे नागरिक यांनी कोविड लसीकरण करणे आवश्यक राहील. सदरील बाबीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील.

जिल्ह्यातील सर्व मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, मंगल कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, रेस्टॉरंट, हॉटेल, क्रिडा संकुल, किराणा दुकाने, सलून दुकाने व विविध प्रकारच्या सर्व आस्थापना याठिकाणी काम करणारे सर्व संचालक व कर्मचारी यांनी लसीकरण करणे बंधनकारक राहील. लसीकरण केल्याबाबतचे प्रमाणपत्र मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सर्व संबंधितांनी सोबत ठेवणे बंधनकारक राहील.

सर्व आस्थापनाधारकांनी त्यांचेकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानी लसीकरण केल्याबाबत कर्मचाऱ्याचे नाव, पहिला डोस घेतल्याचा दिनांक, दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इ. माहिती दर्शविणारा फलक आस्थापनेच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. तसेच सदरील आस्थापनाधारकांनी लसीकरणासह प्रवेश असा फलक दर्शनी भागात लावावा. तसेच सदरील आस्थापनांमध्ये ग्राहकांना सेवा देतांना, लसीकरणाबाबत विचारणा करुन लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने सेवा देण्यात याव्यात व सर्व ग्राहकांना लसीकरणाबाबत व कोविड अनुरुप वर्तणूक बाबत सूचना देण्यात याव्यात.

जिल्ह्यातील सर्व खाजगी वाहनचालक, क्लीनर यांनी लसीकरण पूर्ण करणे आवश्यक राहील व लसीकरण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. तसेच वाहनचालकांनी प्रवाशांना सेवा देतांना लसीकरण केलेल्या प्रवाशांना प्राधान्य देऊन इतर प्रवाशांना लसीकरण करण्याबाबत सूचित करावे.

जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व भाजीबाजार, भाजी मंडई तसेच बाजारात येणारे सर्व विक्रेते यांनी लसीकरण केले असणे व तसे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. याबाबतची अंमलबजावणी संबंधित स्थानिक प्राधिकरणाने करणे आवश्यक राहील.

लसीकरणाबाबत वरील सूचनांसोबतच कोविड अनुरुप वर्तणूक व मास्कचा पूर्णवेळ वापर सर्व शासकीय कार्यालये व वर नमूद सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी करणे बंधनकारक राहील व याबाबत शासन आदेशानुसार दंडात्मक तरतुदीची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जाईल.

कोविड लसीकरणासोबतच कोविडचे परिपूर्ण लसीकरण करणे म्हणजेच लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असणा-या लाभार्थ्यांनी दुसरा डोस सदरील मुदतीत घेणे याबाबतही सूचनांचे पालन करणे वरील आस्थापनांमध्ये आवश्यक राहील. वरील सर्व सूचनांची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित अधिकारी, आस्थापनाधारक यांनी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!