
रोमियोने मित्राच्या गर्लफ्रेण्डला दारु पाजून केला बलात्कार
नागपूर : दारु पाजून तरुणाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी आरोपी रोमिओ गोडबोलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपी हा पीडितेच्या बॉयफ्रेण्डचा मित्र आहे.
पीड़ित तरुणीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार ती आरोपीला सुमारे एक वर्षांपासून ओळखते. पीडिता ही विद्यार्थिनी असून नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील आहे. त्यामुळे ती नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात भाड्यावर खोली घेऊन राहते. पीडित तरुणीला गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रासले होते. आरोपी रोमिओ गोडबोले याने त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत आरोपीने पीडित तरुणीशी जवळीक साधली.
त्यानुसार काल त्याने पीडितेला दारु पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित तरुणी मानसिकरित्या आणखी खचली आहे. तिने लगेचच अजनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी रोमिओ गोडबोले विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली आहे.