पश्चिम विदर्भ

यवतमाळ आयटीआयला राज्यस्तरीय उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार

यवतमाळ दिनांक 28 ऑक्टोबर (प्रतिनिधी)

*कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना १ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविणार*

*राज्यातील आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी विविध उपाययोजना राबविणार*

*- कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक*

राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यवतमाळ शासकीय आयटीआय, औरंगाबाद शासकीय आयटीआय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खाजगी आयटीआय यांना अनुक्रमे राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. रक्कम अनुक्रमे ५ लाख, ३ लाख व २ लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याचबरोबर विभागीय उत्कृष्ट आयटीआय यांना पुरस्कारांचे वितरण तर राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना (शिल्पनिदेशक) यावेळी मंत्री श्री. मलिक यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

आयटीआयमध्ये अध्यापनाचे कार्य उत्कृष्टरित्या बजावणाऱ्या राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना राज्य शासनामार्फत १ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी जाहीर केले.

*विभागीय उत्कृष्ट आयटीआयना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पुरस्कार*

विभागीय उत्कृष्ट आयटीआयनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई विभागात अहमद अब्दुल्ला खाजगी आयटीआय (मुंब्रा, जि. ठाणे), पुणे विभागात सांगली येथील शासकीय आयटीआय, नाशिक विभागात सहजिवन शिक्षण प्रसारक मंडळाचे खाजगी आयटीआय (टेहू, ता. पारोळा, जि. जळगाव), औरंगाबाद विभागात मुलींचे शासकीय आयटीआय (औरंगाबाद), अमरावती विभागात मोर्शी (जि. अमरावती) येथील शासकीय आयटीआय तर नागपूर विभागात नागपूर येथील शासकीय आयटीआयला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. आयटीआय प्राचार्यांनी पुरस्कार स्विकारले.

त्याचबरोबर राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेते आयटीआय शिक्षक (शिल्पनिदेशक) मंगेश पुंडकर (मुलींचे आयटीआय, अकोला), गंगाराम कोलपाटे (शासकीय आयटीआय, मुंबई), रेणुका गव्वाळ (शासकीय आयटीआय, सांगोला, जि. सोलापूर) यांना मंत्री मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मंत्री  मलिक म्हणाले की, राज्यातील आयटीआय आता विविध औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करत आहेत. ऑन जॉब ट्रेनिंगसारखे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयटीआयमधून फक्त नोकरदार निर्माण न करता उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. आयटीआयचे आधुनिकीकरण करणे, त्यामध्ये कालसुलभ अभ्यासक्रम राबविणे यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सध्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्यामाध्यमातून आयटीआयचे विद्यार्थी नोकरीबरोबरच स्वत:चा उद्योग, स्टार्टअप करु शकतील, अशा पद्धतीने त्यांचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, आयटीआयमध्ये विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही आता आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील विविध आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी देशभरात पुरस्कार मिळविले आहेत. देशाला नॉलेज इकॉनॉमी तसेच जगातील सक्षम अर्थसत्ता बनविण्याच्या दृष्टीने सध्या वाटचाल सुरु आहे. यामध्ये कौशल्य विकास विभागाचे विविध उपक्रम महत्वपूर्ण योगदान देतील, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने आता राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यांच्याशी संबंध वाढविले आहेत. त्यामुळे मुलांना फक्त प्रशिक्षण न मिळता त्याबरोबर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष अनुभवही मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने याचा भरीव फायदा होत आहे, असे त्यांनी सांगितले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी प्रास्ताविक केले. राज्यात ४१७ शासकीय तर ५३७ खाजगी आयटीआय असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. ज्योती लोहार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह पुरस्कार विजेत्या आयटीआयचे आजी-माजी प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!