पूर्व विदर्भ

सिंदी (रेल्वे) ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कबाबत सामंजस्य

करारावर एनएचआय व जेएनपीटी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी

 जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा करार

 ना.नितीन गडकरी व पालकमंत्र्यांची उपस्थिती

वर्धा /नागपुर दि.22 (विशेष प्रतिनिधि) : जिल्ह्यातील सिंधी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कच्या स्थापनेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये आज नागपूर येथे सामंजस्य करार करण्यात आला. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा आहे.

सामंजस्य कराराच्यावेळी केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे संचालक के. सतिनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग उपस्थित होते.

नागपूर शहर हे झिरो माईलचे ठिकाण असून देशाच्या हृदयस्थानी आहे. त्यामुळे या शहराला लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पुर्ण क्षमता असून वर्ध्याच्या ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्यामुळे यादिशेने वाटचाल सुरु झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी कराराप्रसंगी केले.

या मल्टी मॉडेल पार्कच्या माध्यमातून वर्धाच्या सिंधी (रेल्वे) ड्रायपोर्ट येथून जगभरात निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या 5 वर्षांमध्ये 50 हजार जणांना रोजगार संधी या पार्कद्वारे उपलब्ध होतील. या प्रकल्पाकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (एन.एच.एल.एम.एल.) या स्पेशल पर्पज व्हेईकल- एस. पी. व्ही. ची स्थापना केली असून या एस. पी. व्ही. सोबत जेएनपीटी काम सुरू करणार आहे.

सदर मल्टी मॉडेल पार्कला रेल्वे व समृद्धी तसेच नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे तसेच या पार्कमध्ये शीतगृह कंटेनरची व्यवस्था असल्याने फळ-पिकाची नासाडी होणार नाही तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल तसेच इतर वस्तू कमी वाहतूक खर्चात निर्यात करता येईल, असे श्री.गडकरी यांनी सांगितील.

याप्रसंगी पालकमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक संपूर्ण मंजुरी देऊ असे आश्वासन दिले. वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सिंधी येथील ड्रायपोर्टच्या बांधकामामध्ये जेएनपीटी द्वारे 127 कोटी रुपये खर्च झाले आहे. देशातील एकूण 35 मल्टी मॉडल पार्क पैकी आसाममधील पार्कचे बांधकाम चालू झाले असून चेन्नई नंतर आता सिंधी या पार्कची स्थापना होत आहे. या पार्कचे क्षेत्रफळ 345 एकर असून हा पार्क सिंदी रेल्वे स्टेशन पासून 1.2 किमी अंतरावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!