
‘लेटरबॉम्ब’नंतर गृहमंत्री व विरोधी पक्षनेत्यांच्या घरापुढे सुरक्षा वाढविली
नागपूर- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १00 कोटी वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला आहे. या लेटरबॉम्बनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या वातावरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणे सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर सीताबर्डी पोलिसांनी त्यांच्या हद्दीत येणार्या गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर तगडा सुरक्षा बंदोबस्त केला आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्या सिव्हिल लाईन येथील निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या बंगल्यासमोर सक्षस्त्र जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रतिआंदोलन केले. त्यांनीही घोषणाबाजी आणि निदर्शने सुरू केली आहेत. यामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर बॅरीकेट लावून तेथे सक्षस्त्र जवानांना तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी शीघ्र कृती दलाचे पथकही तैनात करण्यात आले आहे. गृहमंत्री देशमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्मथकांमुळे आणि विरोधकांमुळे कोणताही धोका उत्पन्न होऊ नये यासाठी रविवारपासूनच गृहमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी तेथे बॅरीकेट लावून त्या भागाला सुरक्षा घेर्यात ठेवण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस पथक सतर्क आहे, अशी माहिती सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनिस यांनी दिली.