नागपूर

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

नागपूर दि २ (प्रतिनिधि) : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही.

आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मुद्दा क्रमांक ४ (xv ) अनुसार मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधीत केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी 30 सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली.

तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली.

राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित केले आहे. दीक्षाभूमी येथे 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोवीड- १९चा प्रोटोकॉल पाळणे, राज्य शासनाचे उपरोक्त निर्देश पाळणे शक्य नसल्याचे, सर्व संस्था व विभागाचे मत आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा हा अभिवादन सोहळा, यावर्षी होऊ शकणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!