पश्चिम विदर्भ

7 ऑक्टोबरपासून वाशीम जिल्हयातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडणार

वाशिम, दि. 01  : राज्यात व जिल्हयात कोविड बाधितांची रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत राज्य शासनाचे मुख्य सचिव यांनी ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण षन्मुगराजन एस. यांनी प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोबर 2021 पासून उघडयाबाबतचे आदेश अटी व शर्तीच्या अधिन राहून पारीत केले आहे.

कोराना प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे/ मंदिरे बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे/ मंदिरे उघडण्यास परवानगी राहील. सर्व नागरीक व सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापक/कार्यवाहक यांनी पुढीलप्रमाणे अटी व शर्तीचे पालन करावे. वय वर्ष 65 वर्षावरील नागरीक, सहव्याधी असलेले नागरीक, गर्भवती महिला आणि दहा वर्षाखालील मुलांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. कोविड-19 बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या सामान्य प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे. कोरोना नियंत्रणासाठी असलेल्या सर्व नियमावलीचे पालन संबंधित प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी/नागरीकांनी करावे. प्रार्थनास्थळी भाविकांना किमान सहा फुटाचे अंतर पाळावे लागेल. प्रार्थनास्थळी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील. प्रार्थनास्थळी वारंवार हात हॅन्डसॅनिटायझरने धुणे आवश्यक राहील. प्रार्थनास्थळाच्या परिसरात थुंकण्यास मनाई असेल. असे आढळल्यास प्रार्थनास्थळ व्यवस्थापक/कर्मचारी यांनी संबंधित व्यक्तीवर दंड आकारावा. खोकलतांना आणि शिंकतांना टिशू पेपर/ रुमाल/ हाताच्या कोपराने तोंड आणि नाक झाकणे आणि वापरलेल्या टिशू पेपरची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. सर्व भाविकांनी स्वत:ची शारिरीक पाहणी करुन आजारविषयक काही लक्षणे आढळल्यास त्वरीत राज्य किंवा जिल्हास्तरीय मदत कक्षाला संपर्क साधावा. प्रार्थनास्थळी येणाऱ्या सर्व भाविकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन वापर करावा.

सर्वधर्मिय प्रार्थनास्थळ व्यवस्थापक यांनी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना

प्रत्येक प्रार्थनास्थळाच्या प्रवेशव्दारावर सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करावी. सर्वधर्मिय प्रार्थनास्थळी कोविड-19 च्या आजाराची लक्ष्णे नसलेल्या व्यक्तीस प्रवेश दयावा. सर्व मास्क घातलेल्या व्यक्तीनाच प्रार्थनास्थळी प्रवेश देण्यात यावा. सर्व प्रार्थनास्थळामध्ये कोरोनाविषयक जनजागृती आणि सुचना देणारे फलक लावणे बंधनकारक राहील. कोरोनाविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत ऑडिओ व व्हिडीओ क्लिप नियमितरित्या प्रार्थनास्थळी लावाव्या. प्रार्थनास्थळी किती लोकांना/नागरीकांना प्रवेश दयावा याबाबत प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापक समिती/ट्रस्टने प्रार्थनास्थळाचा आकार, हवेशीरपणा व भाविकांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील याबाबतची खात्री करुन निर्णय घ्यावा. प्रार्थनास्थळी येणाऱ्या भाविकांनी आपआपले चपला/जोडे वाहनामध्येच ठेवावे किंवा स्वतंत्र/कुटूंबाकरीता नेमुन दिलेल्या जागेत ठेवावे. व्यवस्थापक यांनी भाविकांच्या वाहनाकरीता प्रार्थनास्थळाच्या पार्किंगच्या जागेत आणि आजूबाजूला कोरोनाच्या नियमाला अनुसरुन योग्यप्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून वाहने रांगेत लावण्यात यावी.

प्रार्थनास्थळाच्या बाहेर असणारे सर्व प्रकारचे दुकाने, ठेले व फेरीवाले यांनी कोविड-19 च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रार्थनास्थळी दर्शनाकरीता रांगेत उभे राहण्यासाठी सामाजिक अंतर राखण्यासाठी योग्य नियोजन करुन मार्किंग करावी. भाविकांना प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. प्रार्थनास्थळी प्रवेश करतांना हात व पाय साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक राहील. प्रार्थनास्थळी बसण्याची व्यवस्था करतांना सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक राहील. प्रार्थनास्थळी वातानुकूलित यंत्रणा आणि वेंटिलेटर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियमांचे पालन करावे. प्रार्थनास्थळी एसीची सेटिंग 24 ते 30 डिग्री सेल्सीयस दरम्यान असावे. आर्दतेचे प्रमाण 40 ते 70 टक्के असावे. परिसरात भरपूर शुध्द व स्वच्छ हवा असायला हवी. तसेच शक्य असल्यास क्रॉस वेंटिलेशनची व्यवस्था करावी.

 

प्रार्थनास्थळी मुर्ती/पुतळा/पवित्र ग्रंथ यांना स्पर्श करण्याची परवानगी भाविकांना नसेल. प्रार्थनास्थळी मोठी गर्दी व एकत्र जमण्यास बंदी राहील. प्रार्थनास्थळी कोविड-19 या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शक्यतोवर रेकॉर्ड असलेली भक्ती संगीत/गीते वाजविण्यात यावी. कोणत्याही परिस्थीतीत भजन मंडळी यांना गायन व गटगायन स्पर्धा आयोजित करता येणार नाही. प्रार्थनास्थळी अभिवादन करतांना एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवावे. प्रार्थना करतांना सार्वजनिक चटई/आसनाचा वापर टाळावा. एकाच चटईवर सर्वांनी बसू नये. सर्व भाविकांनी स्वतंत्र चटई/आसन सोबत आणावी व सोबत घेवून जावी. प्रार्थनास्थळी प्रसाद/तिर्थ प्रसाद वाटप करणे व शिंपडणे इत्यादी गोष्टीवर बंदी राहील.

 

प्रार्थनास्थळी नियमित अंतराने सॅनिटायझेशन/स्वच्छता करण्यात यावी. तसेच हातपाय धुण्याच्या ठिकाणाची नियमित स्वच्छता करण्यात यावी. व्यवस्थापक यांनी धार्मिकस्थळाची नियमितरित्या स्वच्छता व निर्जतूकीकरण करावे. धार्मिकस्थळातील जमीन/फर्शी वारंवार नियमितरित्या स्वच्छ करण्यात यावी. धार्मिकस्थळी असलेल्या व्यक्तीने काढून टाकलेले/वापरलेले मास्क, हॅन्डग्लोज याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. धार्मिकस्थळातील कर्मचारी यांना कोविड-19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच दर आठवडयाला कोविड चाचणी करणे बंधनकारक राहील. प्रार्थनास्थळावरील खाण्याचे ठिकाण आणि स्वच्छतागृह या ठिकाणी गर्दीचे नियोजन करावे. संख्या व सामाजिक अंतर तसेच कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करण्यात येईल, याबाबत हमीपत्र प्रशासनास देणे आवश्यक राहील.

 

प्रार्थनास्थळी एखादा व्यक्तीला कोविड-19 ची लक्षणे किंवा कोविड-19 आजाराने बाधित असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीस इतर व्यक्तीपासून अलग करुन स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावे. अशा व्यक्तीस मास्क घालून त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी. तात्काळ जवळच्या रुग्णालयाला किंवा क्लिनीकला कळवावे तसेच जिल्हा मदत कक्षास संपर्क साधावा. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत परिसराची तपासणी/मुल्यामापन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर व्यक्ती/भाविक कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यास मंदिर/धार्मिकस्थळांचे निर्जतूकिकरण करणे बंधनकारक राहील.

 

वरील नियमांचे उल्लंघन केलेली व्यक्ती आढळल्यास अशी व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानूसार व साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशाप्रमाणे प्राधिकृत करण्यात येत आहे. हा आदेश 7 ऑक्टोबर 2021 पासून संपूर्ण वाशिम जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात लागू राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!