ग्रामीण

नागपूर ग्रामीण भागात ‘स्टेमी’ प्रकल्पाची सुरूवात

राजेश टोपे यांनी केला ऑनलाईन शुभारंभ

नागपूर  : हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेऊन ‘स्टेमी’ (ST Elevation in Myocardial Infarction) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देऊन त्यांना जीवदान दिल्या जाते. या प्रकल्पाची सुरूवात आज हृदयरोग दिनाला उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे करण्यात आला. मुंबईवरून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्हर्च्युअल उद्घाटन केले

यावेळी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक रामास्वामी एन, संचालक आरोग्य डॉ. साधना तायडे, सहसंचालक डॉ. पद्मजा जोरगेवार यासह शल्य चिकीत्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार, डॉ. नयना धुमाळे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग होतो. त्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात (गोल्डन अवर) मध्ये औषधोपचार करुन मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ‘स्टेमी’ प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

‘स्टेमी’ प्रकल्प पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रकल्पामध्ये ‘स्पोक’ व ‘हब’ हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. ‘स्पोक’मध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असून त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अति तात्काळ सेवा दिल्या जातात. अशा रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये कामठी, रामटेक येथील उपजिल्हा रूग्णालये तर, भिवापूर, हिंगणा, काटोल, कुही, नरखेड, पारशिवनी, उमरेड येथील ग्रामीण रूग्णालयांचा समावेश आहे.

त्याठिकाणी ‘ईसीजी’ यंत्र लावण्यात येईल. तेथे ईसीजी तंत्रज्ञ असेल. या ठिकाणी रुग्ण आल्यावर त्याचा ‘ईसीजी’ काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘क्लाऊड कनेक्टिव्हीटी’च्या माध्यमातून तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. तज्ज्ञांद्वारे औषधोपचाराबाबत दहा मिनिटांच्या आत मार्गदर्शन केले जाईल.

‘स्पोक’मध्ये रुग्णांचा ईसीजी करुन हृदयविकाराचा झटका आला की नाही, याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तात्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाईल.

‘हब’मध्ये हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय शस्त्रक्रिया करण्याची सोय असलेल्या मोठ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सहभागी असलेली खासगी रुग्णालये यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील शुअर टेक, आशा हॉस्पीटल कामठी, व लता मंगेशकर हॉस्पीटल सिताबर्डी यांचा समावेश आहे.

या स्पोकमध्ये जून 2021 पासून आजपय्रत 1375 रूग्णांची इसीजी काढण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिली. तर 4 रूग्णांची ॲन्जीओप्लॉस्टी हब मध्ये करण्यात आली

‘स्टेमी’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराची सुविधा मिळणार असून त्यामुळे या आजारामुळे होणारे मृत्यु रोखण्यात यश येईल, असा विश्वास आरोग्यमंत्री  टोपे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!