नागपूर

मंगळवारी नागपूरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शून्य ,संक्रमणाचा धोका कमी मात्र नियमांचे पालन करा

नागपूर, ता. २९ : मागील अनेक महिन्यांनंतर नागपूर शहरातून दिलासादायक माहिती पुढे आली. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी केलेल्या एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली.

मंगळवारी शहरामध्ये ३३०९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने मंगळवार शहरासाठी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दिवस ठरला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांचे प्रयत्न आणि नागरिकांचा सामंजसपणा यामुळेच हे शक्य झाले असून याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिक, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. १६ मे २०२० नंतर पहिल्यांदाच नागपूरात एकही रुग्ण कोरोना चाचणी दरम्यान आढळलेला नाही.

मंगळवारी प्राप्त अहवाल आणि मागील महिनाभरापासून मनपाकडे प्राप्त होणा-या कोरोना अहवालावरून शहरामध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाला असल्याचे दिसून येत असले तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी आता लसीकरण हे शस्त्र उपलब्ध आहे.

शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे शहरातील १५५ पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचा प्रभाव आज दिसून येत असून त्यामुळे संसर्गाचा धोका काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. याशिवाय लसीकरणानंतरही पूर्वीप्रमाणेच कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन सार्वजनिक ठिकाणी वावरताना करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन अवश्य करावे, असे आवाहनही महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!