नागपूर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट सिटीतर्फे विविध कार्यक्रम

१ ते ३ ऑक्टोबर दरम्यान शहरात अनेक उपक्रमांचे आयोजन

नागपूर, ता. २९ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या वतीने १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. तिनही दिवस सकाळी ६.३० वाजतापासून विविध कार्यक्रमांना सुरूवात होईल हे कार्यक्रम रात्री ९ वाजतापर्यंत सुरु राहतील. नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे नागपूर स्मार्ट सिटीची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबरला सक्करदरा तलावालगत उद्यानासमोर, २ ऑक्टोबर रोजी सीताबर्डी मेन रोड येथे ग्लोकल मॉलच्या समोर आणि ३ ऑक्टोबर रोजी बिडपेठ तारा उद्यान येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

स्वतंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या अनुषंगाने स्मार्ट सिटीतर्फे सक्करदरा तलावालगत उद्यान येथे १ ऑक्टोबर रोजी सकाळी योगा त्यानंतर उद्योजिका मेळावा, अग्निशमन विभागाचे बँड पथक, देशभक्ती संगीत आदी कार्यक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर दयाशंकर तिवारी भूषवितील. कार्यक्रमात शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आदी प्रमुख्याने उपस्थित राहतील.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला सकाळी व्हेरॉयटी चौक येथून रॅली काढण्यात येईल. रॅलीमध्ये गांधीजींच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचा सहभाग असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ग्लोकल मॉलपर्यंत ही रॅली काढण्यात येईल. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा वापर बंद करा, तंबाखूचे सेवन करू नका, पर्यावरणाचे रक्षण करा आदी संदेश देण्यात येतील. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहिल. कार्यक्रमात जेसीज रॉयल, लॉयन्स क्लब आदी संघटनांचे सहकार्य असणार आहे.

सीताबर्डी येथे दुपारी लॅक्टशन cubiod – पिंक केबिन (बाळांना स्तनपान करण्यासाठी) या विशेष केंद्राचे ग्लोकल मॉल येथे लोकार्पण करण्यात येईल. महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या प्रयत्नाने व स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने पिंक केबिनची स्थापना करण्यात येत आहे. संध्याकाळी उद्योजकांसाठी चर्चासत्राचे तसेच सायबर क्राइमवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागातर्फे नागरिकांना आगीपासून सुरक्षा करण्यासंदर्भात माहिती दिली जाईल.

३ ऑक्टोबर रोजी बिडपेठ येथे तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता होईल. येथे महिलांना आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण, आयुर्वेदिक वृक्षांची माहिती, भरोसा सेलची माहिती व लहान मुलांसाठी स्पर्धा घेण्यात येईल. माझा अडोस-पडोस स्पर्धेत भाग घेणा-या मुलांना पुरस्कार वितरीत करण्यात येतील. या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरातील खासदार, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, स्मार्ट सिटीचे संचालक, झोन सभापती, विषय समिती सभापती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

नागपूर स्मार्ट सिटीच्यावतीने स्ट्रीट फॉर पीपल, नॅचरिंग नेबरहुड, इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज, ईट राईट चॅलेंज आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजमध्ये नागपूरला एक कोटीचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहे. पत्रकार परिषदेमध्ये कंपनी सचिव भानुप्रिया ठाकुर, पर्यावरण विभागाच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, मोबिलिटी विभागाचे राजेश दुफारे, ई-गव्हर्नंस विभागाचे डॉ. शील घुले, मुख्य नियोजक राहुल पांडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!