नागपूर

नागपूरचे ऐतिहासिक वैभव पर्यटकांपर्यंत पोहचविणार

*हेरिटेज वॉक’ने इतिहासाच्या पाऊलखुणांना उजाळा*

 § विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सहभागी

नागपूर, दि. 27: जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हेरिटेजवॉक’ मध्ये विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सहभागी होऊन शहरातील ऐतिहासिक वारसाच्या वैभवाची जवळून पाहणी केली. तसेच संवर्धनासोबत पर्यटकापर्यंत पोहचविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे ‘हेरिटेज वॉक’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे आज इतिहासाच्या पाऊलखुणांना उजाळा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, नागपूर‍ विभाग पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, विदर्भ हेरिटेज सोसयटीचे अध्यक्ष प्रद्युम्न सहस्त्रभोजनी यांची या उपक्रमात उपस्थिती होती.

शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून विविध परकीय आक्रमणे शहराने झेलली आहेत. या परकीय आक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणावर येथील ऐतिहासिक वास्तूवैभव नष्ट झाले आहे. तरीही ऊर्वरित वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांच्या सहकार्यातून जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई आणि इतिहासप्रेमी, टूर आणि ट्रॅव्हल्स एजंट यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करणार असल्याचे श्रीमती लवंगारे -वर्मा सांगितले.

महाल येथील टिळक पुतळा येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठल रुख्मिणी मंदिर, शुक्रवार दरवाजा, मोठा राजवाडा (सिनीअर भोसला पॅलेस) गांधी दरवाजा, कल्याणेश्वर मंदिर, गोंड किल्ला अणि चिटणवीस वाडा येथे हा ‘हेरिटेज वॉक’ समाप्त झाला. दरम्यान श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी मोठा राजवाडा येथे श्रीमती लवंगारे – वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांचा शाल श्रीफळ देत सत्कार केल्यानंतर त्यांनी उपस्थितांसोबत चर्चा केली. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यावेळी म्हणाले, नागपूरला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भोसल्यांचे साम्राज्य कटक ते अटकपर्यंत होते. हा इतिहास जनतेपुढे आला नाही. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून भोसल्यांचा इतिहास, वैभव नव्या पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. सतत ऑनलाईन राहणाऱ्या नव्या पिढीने इतिहासाचे वाचन करावे. तसेच पर्यटन संचालनालयाने बदलत्या परिस्थितीनुसार लोकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी नवतंत्रज्ञान आणि नवमाध्यमांचा वापर करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीमंत जयसिंगराजे भोसले यांनी राजवाड्यातील शाही शस्त्रागार आणि राम मंदिर, शस्त्रांबाबतची उपस्थितांना माहिती दिली. ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ या घोषवाक्यानुसार आज दिवसभरात ‘हेरिटेज वॉक’सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नागपूर परिसरातील पर्यटनस्थळाच्या चित्रफित स्पर्धेचे बक्षीस वितरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे सिताबर्डी किल्ल्याची भिंत, झिरो माईल येथील भिंत्तीचित्राचे ऑनलाईन लोकार्पण, तसेच पर्यटन संचालनालय आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरींग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनार, प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. हेरिटेज वॉकला मोठ्या प्रमाणावर शहरातील टूर्स अँड ट्रँव्हल्सचे एजंट उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!