
डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता आवश्यक: जिल्हाधिकारी अमोल येडगे
विशेष स्वच्छता अभियानाच्या सुरूवातीप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
नगर परिषद व जि.प. आरोग्य विभागातर्फे 2 ऑक्टोबर पर्यत संयुक्त स्वच्छता मोहिम
नागरिकांनी स्वच्छता मोहीम सहभागी व्हावे
यवतमाळ दि. 24 सप्टेंबर : जिल्ह्यात डेंग्यूचा आजार वाढू नये व नियंत्रणात राहावा यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषद यांनी सर्व नागरिकांच्या सहभागाने संपुर्ण जिल्ह्यात 2 ऑक्टोबर पर्यंत घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांनी कोरडा दिवस पाळून घराच्या परिसरातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावून पाणी साचणार नाही यासाठी उपायोजना करून डेंग्यु व मलेरीयाच्या वुत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी दोन दिवसांपुर्वीच जिल्हा परिषद व नगर परिषद यांना संयुक्तरित्या मोहिम राबवून डेंग्यु आजाराचा नायनाट करण्याकरीता एका आढावा सभेत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष स्वच्छता अभियानाची सुरूवात आज यवतमाळ शहरातील जय-विजय चौक व संभाजी नगर परिसरातून करण्यात आली. याठिकाणी साफसफाई मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेवून जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच आरोग्य सभापती साधना काळे, नगरसेवक सुजीत राय, संगीता राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विजय आकोलकर हे देखील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांनी डासाची उत्पत्तीची ठीकाणे नष्ट करणे, शौचालायाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पुर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदि आवश्यक उपाययोजना करण्याचे सांगितले. सदर साफसफाई केवळ एक दिवसासाठी न करता किमान सात दिवस दररोज करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे, नगराध्यक्षा चौधरी व इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या घरी भेटी देवून भांडी व टाक्यात साचलेले पाणी रिकामे केले. कचरा व नाल्यांची सफाई करण्यात आली. साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होत असल्याने जिल्हा परिषदेच्या हिवताप कार्यालयामार्फत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर टेमिफॉस टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आले. नगर परिषदेद्वारे ध्वनीक्षेपाद्वारे स्वच्छतेविषयी साचलेले डबके तसेच कोरडा दिवस पाळणे याबाबत अभियान कालावधीत जनजागृती करण्यात येत आहे. नागरी परिसरात तसेच ग्रामीण भागात जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे स्वच्छता मोहिमेला भेटी देणार आहेत.
यावेळी नगर परिषदेतील डॉ. विजय अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी क्रांतीकुमार मावडीकर, डॉ. तनवीर शेख, प्रशांत पाटील, टि.व्ही.कुळकर्णी, धिरज पिसे, रवि रामेकर, सुनिल वंजारी, मुन्ना शुक्ला, मोहन दहेकर, संतोष गजभिये व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.