
निर्यात क्षेत्रातील संधींविषयी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
• ‘निर्यात संमेलन’मध्ये निर्यातदार, उद्योजकांनी घेतला सहभाग
• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
वाशिम, दि. २४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय, विदेश व्यापार महासंचालनालय, राज्य शासनाचे उद्योग संचानालाय यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आज, २४ सप्टेंबर रोजी विधाता प्रशिक्षण केंद्र येथे एक दिवसीय ‘निर्यात संमेलन’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्यातदार तसेच निर्यात क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निर्यात क्षेत्रातील संधींचा लाभ घेवून जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. डी. खंबायत, अमरावती येथील रुबन एग्रो एक्स्पोर्ट कंपनीचे अमीन खान, ऋषिवट फार्मर प्रोड्युसर कंपनीचे एस. के. देशमुख, उद्योग निरीक्षक के. ए. शेख, वाशिम येथील उद्योजक चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. खंबायत यांनी यावेळी ‘निर्यात संमेलन’ आयोजनाविषयीचा हेतू विशद केला. ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील संधींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामाध्यमातून उत्पादने निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या, नियम, अटी याविषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच आगामी काळात सुद्धा जिल्ह्यातील उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्याच्या निर्यात विषयक कृती आराखड्याच्या अनुषंगाने त्यांनी यावेळी माहिती दिली.
रुबन एग्रो एक्स्पोर्ट कंपनीचे अमीन खान यांनी फळे, शेतीमालाच्या निर्यातीच्या अनुषंगाने माहिती दिली. भारताच्या लगतच्या देशांसह जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय शेतमाल, फळांना मोठी मागणी आहे. मात्र, त्या प्रमाणात व आवश्यक दर्जाची फळे, शेतमाल उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी ज्या मालाला मागणी आहे, अशाच पिकांचे उत्पादन घेण्याविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी यामध्ये पुढाकार घेवून स्वतः शेतमाल निर्यात करण्यासाठी पर्यटन केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल. शेतमाल निर्यातीच्या अनुषंगाने शासनस्तरावर अतिशय सुलभ प्रक्रिया असल्याचे त्यांनी अमीन खान म्हणाले.
वाशिम येथील कालुराम फूड प्रोडक्ट्सचे संकेत रुहाटीया म्हणाले, भारतातील सोयाबीनपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांना विदेशात चांगली मागणी आहे. तसेच आता सेंद्रिय पद्धतीने उत्पादित मालाच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील मागणीचा विचार करून पीक पद्धतीत बदल केल्यास शेतमालाला चांगला दर मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच निर्यातक्षम सोयाबीन पदार्थ बनविण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.