
एक अनोखा लग्न सोहळा
एक अनोखा लग्नसोहळा पार पडला आहे. 66 वर्षांची वधू आणि 79 वर्षांचे वर (Elderly couple getting married) बोहल्यावर चढले आहेत. मात्र हा लग्न सोहळा सुखी संसारासाठी नव्हे तर आयुष्याच्या सरते शेवटी दोघांनाही जगण्यासाठी एकमेकांचा आधार मिळावा म्हणून झाला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे (dadasaheb salunkhe) (वय 79) यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होतं. त्यांना एक मुलगा आहे. पण तो त्याच्या प्रपंचात व्यस्त आहे. त्यामुळे दादासाहेब साळुंखे यांना आपल्या पोटासाठी व इतर गोष्टींसाठी खूप अडचणी येत होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांची ही जगण्याची फरपट सुरू होती. त्यामुळे एकाकी जगणाऱ्या साळुंखे आजोबांनी आयुष्याच्या सरते शेवटी कोणाचा तरी आधार आणि तोही पत्नीचा आधार असावा, असं वाटतं होते.
त्यामुळे दादासाहेब साळुंखे यांनी पुन्हा लग्न करण्याचा निश्चित केला. तशी संमती ही त्यांच्या मुलाकडून मिळवली. पण वयाच्या 79 व्या वर्षी लग्नासाठी वधू मिळणार कुठे? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तसंच दादासाहेब साळुंखे हे कुणी उद्योजक किंवा धनाढ्य नव्हते, त्यामुळे त्यांना वधू शोधणं हे खूप मोठं आव्हान होतं. शिवाय त्यांच्या वयाकडे बघता, समवयस्क वधू मिळणे अशक्य होतं. मात्र, दादासाहेब साळुंखे यांना मिरजेतल्या महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बेघर केंद्राची माहिती मिळाली, ज्या ठिकाणी निराधार महिलांचा सांभाळ केला जातो आणि साळुंखे यांनी थेट आस्था बेघर महिला केंद्र गाठलं आणि तिथे त्यांना आपल्या जीवनाची सोबती सापडली.
आस्था बेघर केंद्राच्या (Astha Homeless Center Sangli) प्रमुख असणाऱ्या सुरेखा शाहीन शेख यांनी दादासाहेब साळुंखे यांच्याकडून त्यांचे विचार आणि मत जाणून घेतलं. त्यानंतर त्यांना बेघर केंद्रात असणाऱ्या शालिनी या 69 वर्षीय महिलेची गाठ घालून दिली, मग दोघांचे विचार जुळले व एकमेकांचे विचार,सुख- दुःख वाटून घ्यायचा निर्णय दोघांनी घेतला.