नागपूर

नगरसेवकांच्या सहकार्याने हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण पूर्ण करा : महेश महाजन

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश

 नागपूर, ता. २३ : शासनाच्या निर्देशानुसार सन २००४ पासून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषोधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेद्वारे शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण किती कमी झाले शहानिशा करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागातर्फे २७ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण ४ दिवसात पूर्ण करायचे असल्यामुळे स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने संपूर्ण सर्वेक्षण कार्य पूर्ण करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी दिले.

हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाच्या तयारी संदर्भात टास्क फोर्सची बैठक गुरूवारी (ता.२३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये घेण्यात आली. यावेळी आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे, जागतिक आरोग्य संघटनेच्या झोनल समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी आणि सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. या सर्वेक्षणात पालकांची महत्वाची भूमिका असल्यामुळे त्यांनी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

सर्वेक्षणासाठी ६ ते ७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे नमूने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांचे योग्य समुपदेशन करणे आवश्यक आहे, असे डॉ. संजय चिलकर यावेळी म्हणाले. हत्तीरोग आजाराचा प्राथमिक संसर्ग ६ ते ७ वयोगटातील मुलांमध्ये आढळून येत असल्यामुळे या मुलांची निवड करण्यात आली आहे. वेळेत सर्वेक्षण व्हावे यासाठी झोन सभापती, स्थानिक नागरसेवकांसोबत बैठक घेऊन योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व झोनल वैद्यकीय अधिका-यांना दिल्या. तसेच जास्तीत जास्त मुलांचे सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी पालकांनीसुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या झोनल समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी यांनी सर्वेक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाचे प्रशिक्षण शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी मनपाच्या राजे रघूजी भोसले नगरभवन येथे घेण्यात येणार आहेत. यात सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि हत्तीरोग विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वेक्षणात जी मुले किंवा मुली हत्तीरोग सकारात्मक आढळून येतील त्यांना त्याच दिवसापासून मनपातर्फे उपचार सुरु करण्यात येईल. पुढील पाच वर्ष ते मुले मनपा आरोग्य विभागाच्या निगराणीत राहील. त्यामुळे हत्तीरोग रक्त तपासणीसाठी आपल्या वस्तीत येणाऱ्या मनपाच्या आरोग्य चमूकडून आपल्या पाल्यांची तपासणी करावी आणि हत्तीरोग दुरीकरणासाठी सहकार्य करा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यावेळी केले.

आशा वर्कर, आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीने ६ ते ७ वर्षाच्या मुलांची रक्त तपासणी करुन घेतील. ६ ते ७ वर्ष वयोगटातील मुलांच्या रक्तामध्ये हत्तीरोगाचे जंतू विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक आढळणे म्हणजे क्रियाशील हत्तीरोग संक्रमणाची खूण आहे. या मुलांच्या रक्त तपासणीच्या निष्कर्षावरुन संबंधीत क्षेत्रामध्ये हत्तीरोगाच्या जंतुचे संक्रमण अजूनही सुरु आहे किंवा नाही याची अचूक माहिती मिळेल. त्यानुसार भविष्यात सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहीम राबवायची किंवा नाही हे ठरविता येणे शक्य होईल. संक्रमण पडताळणी सर्वेक्षण मोहीम यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जनतेने पुढे येण्यासाठी हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे यांनी कळविले आहे. नागरिकांसोबतच विशेषत: रक्त नमुना देणा-या मुलांच्या पालकांनी मोहीम राबविण्यात पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!