
खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपातर्फे झोनस्तरीय कार्यवाही
नागपूर, ता. २२ : नागपूर शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपाच्या हॉटमिक्स प्लाँट विभागातर्फे सर्व झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाही अंतर्गत बुधवारी २२ सप्टेंबर रोजी नेहरूनगर आणि लकडगंज झोनमधील विविध मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले.
बुधवारी (ता.२२) नेहरूनगर झोनमधील हसनबाग रोडवरील २० खड्डे बुजविण्यात आले. या मार्गावर २६० वर्ग मीटर जागेमध्ये विभागाद्वारे कार्यवाही करण्यात आली. याशिवाय लकडगंज झोनमधील भांडेवाडी रोडवरील १५ खड्डे बुजविण्यात आले व १९८ वर्गमीटर रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली.
यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी विभागातर्फे मंगळवारी, धरमपेठ झोनमध्ये कार्यवाही करण्यात आली. मंगळवारी झोनअंतर्गत नारा घाट गोडाऊन येथील रोडवरील ९ खड्डे बुजवून १९० वर्गमीटर रस्ता दुरुस्ती कार्य करण्यात आले. याच झोनमध्ये झिंगाबाई टाकळी बाबा फरीद रोडवरील १२ खड्डे बुजविण्यात आले व ७१.२५ वर्गमीटर दुरुस्ती कार्य करण्यात आले.
धरमपेठ झोनअंतर्गत फ्रेंड्स कॉलनी येथील रोडवरील ३१ खड्डे बुजवण्यात येऊन २३१ वर्गमीटरचे काम विभागाच्या वतीने करण्यात आले. नागपूर शहरातील झोननिहाय खड्ड्याचे करण्यात आलेले सर्वेक्षण नुसार हॉटमिक्स विभागाद्वारे खड्डयांची दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.