
मदन उन्नई धरण जलसाठ्यात दिले जीव वाचविण्याचे प्रात्यक्षिक
आठही तालुक्यातील शोध व बचाव पथकातील सदस्यांचे प्रशिक्षण
वर्धा, दि 22 सप्टेंबर :सध्या सर्वत्र जोरात पाऊस सुरू असताना नदीनाले धरण आणि तलाव ओसंडून वाहत आहेत अशा परिस्थितीत पूर येऊन जीवित व वित्तहानी होते अशावेळी स्थानिक संसाधनांचा वापर करून जीवित हानी कशी टाळावी याचे तीन दिवसीय प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शोध व बचाव पथकातील सदस्य, पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नदीकाठावरील गावातील तरुण यांना देण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे वतीने जिल्ह्यातील शोध व बचाव पथकाचे सदस्यांचे तसेच पूर व नदीकाठावरील गावातील तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील तरुण, पोलीस स्वयंसेवक यांची पूर व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षण एडवेंचर अकॅडमी यांच्या वतीने मदन उन्नई धरणाच्या ठिकाणी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले.
मदन उन्नई धरण ठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य तसेच वर्धा तालुका शोध बचाव पथकातील सदस्यांना तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.यात पुरातील वाहत पुरात वाहून जाणारे व्यक्तीला वाचविणे त्याला बाहेर काढणे बोट तराफा तसेच स्थानिक संसाधनांच्या वापर करून जीव कसा वाचवावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले वेगवेगळ्या स्थानिक साहित्य पासून बचाव साहित्य कसे तयार करावे याचे हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले त्याचा सराव प्रशिक्षणार्थी कडून करून घेण्यात आला
21 सप्टेंबरला प्रशिक्षणात जिल्हा शोध व बचाव पथक तसेच वर्धा तहसील शोध व बचाव पथकातील सदस्यांना एडवेंचर अकॅडमीचे श्रीमती बिमला देऊस्कर व अविनाश देऊस्कर यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षक आतिश भडांगे विश्वजीत चहांदे मनीषा धुर्वे एव्हरेस्टवीर उमाकांत मडावी श्री प्रतीक जीवन यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी सेलू तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार, राम कांबळे यांनी भेट दिली तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले.
22 सप्टेंबरला सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील शुद्ध व बचाव पथकातील सदस्य आणि नागरिकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. तर 23 सप्टेंबरला आर्वी आष्टी कारंजा येथील शोध व बचाव पथकातील सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.