
नीट, जेईई प्रवेश प्रक्रियेबद्दल मनपा समुपदेशन केन्द्रात माहिती
नागपूर,ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हील लाईन्स मुख्यालयातील महापौर कार्यालयात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व दहावी – बारावीनंतर पुढे काय करता येईल याबद्दलची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या समुपदेशन केन्द्राला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या केन्द्रामध्ये नीट, जेईई, सी ई-टी, जेईई ॲडवांस आणि एम.एच.सीईटी च्या विद्यार्थ्यांना प्रवेश संबंधी माहिती आणि तिची प्रक्रिया सांगितली जात आहे. अकरावीच्या ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयमध्ये प्रवेश नाही मिळाला त्यांचेसुध्दा समुपदेशन केल्या जात आहे तसेच बी.ए., बी.काम, बी.एस.सी. आणि इतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रक्रिये संबंधी माहिती दिली जात आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये समुपदेशक उमेश कोठारी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करीत आहेत. कोठारी यांनी सांगितले की, मनपाने उपलब्ध करून दिलेली ही उत्तम सोय असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत. त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात याचा मोठा लाभ होईल. समाजात असे अनेक परिवार आहेत ज्यांचे शिक्षण कमी असल्यामुळे किंवा प्रशासकीय कार्यपालन पध्दतीच्या माहितीअभावी त्यांना बराच त्रास होतो. काही मुलांचे वर्षसुध्दा वाया जाते, असे बरेच विद्यार्थी येथे येऊन समुपदेशनाचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.