नागपूर

महिलांच्या विशेष लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद, एवढ्या हजार महिलांचे लसीकरण

*लसीकरणाने संरक्षित झाली नारीशक्ती ….!*

नागपूर, ता. 21 :  आज जिल्ह्यात 330 केंद्राद्वारे महिलांची विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 22 हजार 230 महिलांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या मोहिमेतील एक मोठा टप्पा आज पार पाडण्यात आला. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी नारीशक्ती संरक्षित असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आज झालेल्या लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण होण्याचे प्रमाण कमी असल्याने तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर कोरोनाचा विशेष प्रभाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील 330 लसीकरण केंद्रांवर ही मोहिम आज राबविण्यात आली. यात नागपूर शहरातील 166 लसीकरण केंद्रांचा समावेश होता. महानगरपालिका क्षेत्रात 12 हजार 363 व ग्रामीण भागात 9 हजार 867 महिलांचे लसीकरण करण्यात आले.

महिलांमध्ये गरोदर माता व महीला युवती यांचा लसीकरण मोहिमेला विशेष प्रतिसाद दिसून आला. या लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील लसीकरणाला गतिमान करण्यासाठी व लोकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी सध्या प्रशासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला स्वतः सुरक्षित झाल्यास संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहील. या दृष्टीकेाणातून ही विशेष मोहिम आखण्यात आली.

आज मंगळवारचा दिवस महिलांचा विशेष दिवस राहीला. या मोहिमेत आज घरात काम करणाऱ्या महिला, शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला, मजूर, कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. जिल्हाभरातील महिला बचत गट, महिला संघटना, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला संघटक, सर्व महिलांनी या मोहिमेत हिरीरीने भाग घेतला.

जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान झाली आहे. त्याच्या पहील्या टप्प्यात 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत 61 अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. कोरोनापासून रक्षणासाठी लसीकरण हाच शास्त्रोक्त उपाय आहे, हे सिध्द झाले आहे. लसीकरणासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा विशेष पूढाकार राहिला आहे. नागपूर व अमरावती विभागतील नागरिकांच्या लसीकरणासाठी उर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी तर्फे सामाजिक दायित्व अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण नुकतेच 20 ऑगस्ट रोजी करण्यात आले.

जिल्ह्यात एकूण 34 लाख 48 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले आहेत. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 24 लाख 83 हजार तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 9 लाख 64 हजार एवढी आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 16 लाख 43 हजार महिलांचे लसीकरण झालेले आहे तर 18 लाख 3 हजार पुरुषांचे लसीकरण झालेले आहे. नागपूर शहरात 19 सप्टेंबरपर्यंत 19 लाख 11 हजार लोकांचे लसीकरण झालेले आहेत. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 13 लक्ष 13 हजार तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5 लक्ष 97 हजार एवढी आहे.

नागपूर ग्रामीण भागात 19 सप्टेंबरपर्यंत तालुका निहाय भिवापूर- 58 हजार 506, हिंगणा- 1 लक्ष 56 हजार 432, कळमेश्वर- 99 हजार 955, कामठी- 1 लक्ष 50 हजार 97, काटोल- 1 लक्ष 7 हजार 156, कुही- 65 हजार 694, मौदा- 87 हजार 607, नागपूर ग्रामीण- 1 लक्ष 65 हजार 576, नरखेड- 96 हजार 7, पारशिवनी 91 हजार 742, रामटेक- 76 हजार 621 सावनेर- 1 लक्ष 51 हजार 206, उमरेड- 1 लक्ष 39 हजार 911 एकूण 14 लक्ष 46 हजार 510 नागरिकांचे लसीकरण झाले होते.

लसीकरण मोहिम सुरू असली तरी नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!